खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं १ हजाराहून अधिक बांधवांना लाभ मिळणार

दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला असून १ हजाराहून अधिक दिव्यांग बांधवांना विनामूल्य ट्रायसिकल, व्हीलचेअर, हिअरिंग एड असा लाभ मिळणार आहे. कल्याणमधील तिसाई मंदिर येथे येत्या रविवारी एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आणि मंदाताई आमटे यांच्या हस्ते दिव्यांगांना या साहित्याचं वाटप होणार आहे. दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या अनेक योजना असतात. परंतु त्याची पुरेशी माहिती मिळत नसल्यामुळं या योजना दिव्यांगांपर्यंत पोहचत नाहीत. यासाठी या योजनांचा लाभ ख-या अर्थानं लाभार्थींना मिळावा या उद्देशानं गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कल्याण लोकसभा मतदार संघात विविध ठिकाणी दिव्यांग सहाय्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबीरामध्ये दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून गरजू लाभार्थींची यादी तयार करण्यात आली होती. या यादीनुसार दिव्यांगांना दिलं जाणारं मदत साहित्य निश्चित करून अपेक्षित खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आलं. खासदार श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांकडे पाठपुरावा करून या निधीला मंजुरी मिळवली आणि मंत्रालयाच्या अखत्यारीतील अल्मिको या कंपनीच्या सहकार्यानं या मदत साहित्य वाटप मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दिव्यांग हे अनेक सोयीसुविधांपासून वंचित असतात. कृत्रिम अवयव, शस्त्रक्रिया अथवा वैद्यकीय उपकरणांचा खर्च परवडणारा नसतो. त्यातच अपंगत्वामुळे उपजिविकेचीही समस्या निर्माण होते. यामुळं शासकीय योजनांचा लाभ दिव्यांगांपर्यंत पोहचवणं आवश्यक आहे. याच उद्देशानं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आता १ हजाराहून अधिक दिव्यांगांना विनामूल्य मदत उपलब्ध होणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.

Leave a Comment

%d bloggers like this: