ठाण्यातील कोरम मॉलमध्ये भल्या पहाटे बिबळ्यानं दर्शन दिल्यामुळं खळबळ उडाली आहे. काही वर्षापूर्वी बिबळ्या खोपट येथील बाटा कंपाऊंड पर्यंत आला होता. त्यानंतर मात्र अचानक बिबळ्याचं दर्शन झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. भरवस्तीतील कोरम मॉलमध्ये बिबळ्या पहाटेच्या सुमारास शिरला. याचं वृत्त हा हा म्हणता पसरल्यानं बघ्यांची गर्दी जमली होती. कोरम मॉलच्या क्लोज सर्किट कॅमे-याच्या चित्रीकरणात हा बिबळ्या दिसून आला. काही वेळानं म्हणजे साधारणत: साडेपाचच्या सुमारास हा बिबळ्या कोरम मधून बाहेर पडल्याचंही क्लोज सर्किट कॅमे-यामध्ये दिसलं. बिबळ्याचं वृत्त येताच अग्निशमन दल, पोलीस, वन विभाग आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं कोरममध्ये धाव घेतली. कोरमची तपासणी करण्यात आली. पण तिथे बिबळ्या काही मिळाला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी कोरम मॉल बंद ठेवण्यात आला होता. कोरममधून बाहेर पडलेला हा बिबळ्या सिंघानिया हायस्कूल समोरील सत्कार रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये दिसला. या ठिकाणीही त्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. वन विभागाच्या अधिका-यांनी केलेल्या सत्कार रेसिडेन्सीच्या पाहणीनंतर हा बिबळ्या हॉटेलच्या तळघरात लपल्याचं स्पष्ट झालं. हॉटेलच्या प्रवेशद्वारातून हा बिबळ्या आत आल्याचं क्लोज सर्किट कॅमे-यामध्ये चित्रीत झालं होतं. त्यामुळं कोणत्याही कर्मचा-याला खाली पाठवू नये अशा सूचना दिल्या जात होत्या. तळघरातून बिबळ्याला बाहेर काढण्यासाठी फटाके वाजवण्यात आले. त्यानंतर त्याला गुंगीचं इंजेक्शन मारून बेशुध्द करण्यात आलं आणि बिबळ्या बेशुध्द झाल्यावर वन विभागाच्या पिंज-यात त्याला ठेवण्यात आलं. बिबळ्या पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असताना बघ्यांच्या गर्दीमुळे यामध्ये अडचण निर्माण होत होती. बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अगदी पालकमंत्रीही ही कारवाई पाहण्यासाठी आले होते. अखेर वन विभागाच्या पिंज-यामधून या बिबळ्याला वन विभागाचे अधिकारी घेऊन गेले आणि जवळपास ७ तास चाललेलं हे नाट्य अखेर शांत झालं.
