कुख्यात गुंड सुरेश पुजारीचा हस्तक मिरचु शर्माला ठाणे पोलीसांच्या खंडणी विरोधी पथकानं केली अटक

कुख्यात गुंड सुरेश पुजारीचा हस्तक मिरचु शर्माला ठाणे पोलीसांच्या खंडणी विरोधी पथकानं उल्हासनगर येथून अटक केली. खडकपाडा पोलीस ठाण्यात पुजारीने एका व्यापा-याकडे ५० लाखांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याप्रकरणी शर्मा याला अटक करण्यात आली. न्यायालयानं त्याला १३ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उल्हासनगर मधील व्यापा-याला १९ आणि २० एप्रिल रोजी परदेशातून सुरेश पुजारीने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून ५० लाखांच्या खंडणीसाठी फोन केला होता. तसंच रक्कम दिली नाही तर मुलाला गोळी घालून ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानं खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रदीप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू होता. याच तपासादरम्यान मिरचु हा उल्हासनगर मधील व्यावसायिकांची माहिती पुजारीपर्यंत पोहचवतो ही बाब उघड झाल्यावर पोलीस निरिक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने त्याला अटक केली. पुजारी उल्हासनगरमध्ये व्हीडीओ गेम चालवताना त्याच परिसरात मिरचु राहत होता. तिथूनच तच्या दोघांची ओळख झाली. त्यानंतर तो प्रतिष्ठीत व्यक्तींची माहिती पुजारीला पुरवत असे. त्याद्वारे पुजारी त्यांना फोन करून धमकावत होता. मिरचु वर उल्हासनगर येथे खूनाचा गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्याला अटक झाली होती. अशी माहिती पोलीसांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading