कळवा, मुंब्रा, दिवा परिसरातील वीज वितरण व्यवस्थेचे होत असलेल्या खाजगीकरणाविरोधात सर्वपक्षीय नेते एकवटलेले असतानाच काँग्रेसनंही टोरंट कंपनीच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झोपून गो बॅक टोरंट म्हणत टोरंट कंपनीचा निषेध केला. अचानक खाजगीकरण होणार असल्यानं मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. टोरंट पॉवर कंपनीचा भिवंडी येथील महावितरणच्या कामाचा अनुभव चांगला नसून भिवंडी परिसरामध्ये टोरंट पॉवर कंपनी विरोधात नागरिकांचा प्रचंड असंतोष आहे.
दरम्यान येत्या १९ जानेवारीला कळवा, मुंब्रा दिवा परिसर बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय नेते मंडळींनी दिला होता. मुंब्रा परिसरात ठाणे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडले असून चक्क रस्त्यावर झोपून टोरंट कंपनीच्या विरोधात आंदोलन केलं. या खाजगीकरणात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हे खाजगीकरण त्वरीत रोखा नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी दिला.
