कळव्यातील मनिषानगर येथील स्मशानभूमीचं आधुनिकीकरण आणि नुतनीकरणाच्या कामाचे महापालिका आयुक्तांच्या हस्ते भूमीपूजन झाले. कळव्यातील मनिषानगर येथील स्मशानभूमीत संपूर्ण कळव्यातील नागरिक अंत्यविधी करतात. या स्मशानभूमीमध्ये गेली अनेक वर्ष कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नव्हत्या. स्मशानभूमीच्या परिसरात राहणा-या नागरिकांना धूर, प्रदूषण तसंच दुर्गंधी अशा समस्यांना समोरं जावं लागत होतं. स्मशानभूमीच्या ठिकाणी असलेल्या साहित्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळं तसंच जुन्या आणि जर्जर झालेल्या उपकरणांमुळं हवेत मिसळणा-या धुराचा आणि राखेचा दुष्परिणाम येथील रहिवाशांच्या स्वास्थ्यावर होत होता. त्यामुळं या स्मशानभूमीच्या नुतनीकरणाची गरज या परिसरातील नगरसेवकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. महापालिका आयुक्तांनीही तात्काळ स्मशानभूमीचं आधुनिकीकरण आणि नुतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. काल या कामाचे भूमीपूजन झाले. या स्मशानभूमीच्या नुतनीकरणासाठी साडेसहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या ७ ते ८ महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. या स्मशानभूमीच्या आधुनिकीकरणात स्मोक न्यूसन्स अबोरट सिस्टीम उभारण्यात येणार असून शववाहिनीतून पसरणारा धूर आणि राख ही पाण्याच्या टाकीत सोडण्याची व्यवस्था असून वातावरणात पसरणारी राख आणि धूर पाण्यात विरघळले जाणार आहे.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2019/03/mukund-keni-1-1.jpg)