कळवा पोलीसांनी एका अल्पवयीन मुलाकडून ९ चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. वाहन चोरीला आळा घालण्यासाठी पोलीसांतर्फे विविध प्रयत्न सुरू असून यामध्ये नियमित नाकाबंदी केली जात आहे. अशा नाकाबंदीत पोलीस निरिक्षक सचिन गावडे यांनी एका संशयित दुचाकीस्वाराला थांबवून त्याच्याकडे कागदपत्रांची चौकशी केली पण त्याने समाधानकारक उत्तरं न दिल्यानं त्याला दुचाकीसह ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यानं राजाराम चव्हाण याच्याकडून ही गाडी चालवण्यासाठी घेतल्याचं सांगितलं. त्यानुसार चौकशी करण्यात आली असता कळवा आणि मुलुंड परिसरामध्ये या अल्पवयीन बालकानं वाहन चोरीचे गुन्हे केल्याचं उघड झालं. त्यानुसार पोलीसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडील कळव्यातील ३ आणि मुलुंडमधील ५ दुचाकी आणि १ रिक्षा जप्त करण्यात आली. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
