कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमधील पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी वेळापत्रक ठरवण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमधील पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी विभाग करून त्यानुसार वेळापत्रक ठरवावं आणि पुरेशा दाबानं पाणी पुरवठा करावा जेणेकरून सर्व गावांमध्ये पुरेशा दाबानं पाणी पुरवठा होईल असे आदेश पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिले आहेत. पुढील आठवड्यात या संदर्भात पुन्हा एक आढावा बैठक घेतली जाणार असून आदेशाप्रमाणे कार्यवाही न झाल्यास अधिका-यांवर कठोर कारवाईचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला आहे. २७ गावांमधील पाणी टंचाईसंदर्भात पालकमंत्र्यांच्या पुढाकारानं विधानभवनात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं जलसंपदा विभागाकडे १०० दशलक्ष घनमीटर अतिरिक्त पाणी उचलण्याची परवानगी मागितली आहे पण बारवी आणि आंध्र धरणात सध्या १२ दशलक्ष घनमीटर पाणी साठा उपलब्ध असून जुलैपर्यंत पाण्याचं नियोजन करायचं असल्यामुळं सध्या पाणी पुरवठ्यात वाढ करता येणार नाही असं सांगण्यात आलं. यावर पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करत सर्व विभागांना पूर्ण दाबाने निश्चित वेळेत पाणी पुरवठा झाला तर पाणी टंचाईच्या तक्रारी उद्भवणार नाहीत असं सांगितलं. दिव्यासाठी वाढीव पाणी पुरवठा केला जाणार आहे. या बैठकीत उपमहापौर रमाकांत मढवी यांनी दिवा, शीळ, देसाई परिसराला २० दशलक्ष घनमीटर अतिरिक्त पाणी देण्याची मागणी मे २०१६ मध्ये झालेल्या बैठकीत केली होती. त्याप्रमाणे १० दशलक्ष घनमीटर पाणी वाढवून देण्यात आलं. उर्वरित पाणी पावसाळ्यानंतर वाढवून मिळणार होतं. मात्र २ वर्ष उलटूनही हे पाणी न मिळाल्याची बाब या बैठकीत मांडली. त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांनी अधिका-यांना यावेळी दिले.

 

Leave a Comment

%d bloggers like this: