ठाणे महापालिकेच्या अनुषंगानं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेऊन महापालिका आयुक्तांनी समूह विकास योजनेसाठी अतिक्रमित जागा उपलब्ध करून देणे, जलकुंभ, वाहनतळासाठी खुली जागा आणि रूग्णालयासाठी सुविधा भूखंड अशा विविध विषयांवर महामंडळाच्या अधिका-यांशी चर्चा केली. भुयारी गटार योजनेच्या टप्पा क्रमांक २ साठी विटावा येथील १६०० चौरस मीटरची जागा महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली असून त्याबाबत करारनामा करणं, कोपरी येथील प्रक्रिया केलेल्या निर्जंतुक मलजलाचं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील औद्योगिक कंपन्यांना कमी दरानं पाणी पुरवठा करणं, वागळे इस्टेट मधील रस्ता रूंदीकरणाची कामं समन्वयानं मार्गी लावणं, जलकुंभासाठी जागा उपलब्ध करून देणं अशा विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन महापालिकेनं सुधारीत प्रस्ताव देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. वागळे इस्टेट औद्योगिक वसाहतीचे नियोजन प्राधिकरण हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असून या वसाहतीचा आराखडा ५० वर्षापूर्वीचा आहे. यामध्ये कामगारांना निवासाची तसंच इतर कुठलीही सुविधा नसल्यानं तिथे काही जागांवर अतिक्रमण होऊन अनधिकृत वसाहती निर्माण झाल्या आहेत. यापैकी काही अतिक्रमित जागा समूह विकास योजनेअंतर्गत महापालिकेस देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. याबाबतचा प्रस्ताव महामंडळाला सादर करून त्यावर महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्याविषयी चर्चा झाली. वाहनतळासाठी ओएस ७ हा भूखंड देण्याबाबत चर्चा झाली. महापालिकेच्या वतीनं रूग्णालयासाठी मोकळा भूखंड देण्याबाबत कार्यवाही करण्याची चर्चा यावेळी करण्यात आली.
