आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाचं सूक्ष्म पातळीवर नियोजन – रावसाहेब दानवे

नागपूर, जालना, औरंगाबादसह राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात बूथ लेव्हल पातळीपर्यंत भारतीय जनता पक्षाचं काम समाधानकारक झाल्याचा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ठाण्यात बोलताना केला. रावसाहेब दानवे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत असून ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघांची पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांनी एका पत्रकार परिषदेत हा दावा केला. डिसेंबरच्या मध्यापर्यंत राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आगामी निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षानं अगदी सूक्ष्म पातळीवर नियोजन केलं असून ६० मतदारांमध्ये एक कार्यकर्ता असणार आहे आणि या कार्यकर्त्यावर मतदाराला मतदानापर्यंत आणण्याची जबाबदारी असेल असं दानवे यांनी सांगितलं. पक्षानं ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी ४८ विस्तारक नेमले असून ते निवडणुकांपर्यंत प्रचाराचं काम करणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं. निवडणुकीच्या तोंडावर असे वाद होत असतात. ते नैसर्गिक असून त्याची कोणी गांभीर्यानं दखल घेत नाही असं आमदार अनिल गोटे यांच्या वादावरून बोलताना दानवे यांनी सांगितलं. निवडणुकांसाठी उमेदवारांची निवड ही पार्लमेंटरी बोर्ड करतं. यामध्ये स्थानिक नेत्यांची मतंही विचारात घेतली जातात असंही रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं. उध्दव ठाकरे यांच्या अयोध्या दौ-याचं स्वागत करतानाच एनडीए मधील सर्व सभासदांना एकत्र ठेवण्याचा भारतीय जनता पक्षाचा उद्देश आहे असं शिवसेनेच्या टीकेवर भारतीय जनता पक्ष शांत का या प्रश्नाला उत्तर देताना रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.

Leave a Comment