ठाणे ग्रामीण पोलीसांनी कौशल्यानं तपास करत अपहरण झालेल्या एका लहान बालकाचा शोध लावण्यात यश मिळवलं आहे. अंबिका वीटकर यांचा एक वर्ष १० महिन्यांचा मुलगा यश त्याच्या आजीजवळ म्हारळगाव येथे झोपला असताना कोणीतरी त्याला जून २०१८ मध्ये पळवून नेले होते. याप्रकरणी यशची आई अंबिका यांनी पोलीसांकडे तक्रार नोंदवली होती. अंबिका यांचे पती हे मृत झाल्यामुळं त्या त्यांची आत्या हनुमंती वीटकर यांच्याकडे राहत होत्या आणि स्टेशनवर भीक मागून उदरनिर्वाह करत होत्या. यशचा शोध सुरू असताना पोलीसांना सोमनाथ पवारनं यशचं अपहरण केलं असावं अशी माहिती मिळाली. त्यावरून त्याचा तपास केला असता यशला कराड येथे नेलं जात असल्याचं पोलीसांना समजलं. पोलीसांनी एक पथक तयार करून यशला रेणुका पवार यांच्यासह ताब्यात घेतलं. याप्रकरणी यशला पळवून नेण्यामागे असलेल्या सहभागाबद्दल सोमनाथ पवार आणि रेणुका पवार यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोणताही धागादोरा नसताना कौशल्यानं तपास करून ठाणे ग्रामीण पोलीसांनी यशला पुन्हा आईच्या ताब्यात देण्यात यश मिळवलं आहे.
