देशाचे माजी उपप्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी एकता दौड म्हणजे रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या एकता दौडचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवाजी पाटील यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ देऊन शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय एकता, अखंडता आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी मी स्वत:ला समर्पित करीन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोहचवण्यासाठी मी प्रयत्न करीन. मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता माझं स्वत:चं योगदान देण्याचा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करत आहे अशी प्रतिज्ञा यावेळी सर्वांनी केली. या एकता दौडमध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता.