दत्तजयंतीचा उत्सव आज मोठ्या भक्तीभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दत्तजयंतीचं औचित्य साधून शहरातील विविध भागांमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध दत्तमंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दत्तजयंतीनिमित्त दत्तमंदिरांवर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती. दत्तमंदिरांप्रमाणेच साईबाबा मंदिर, स्वामी समर्थ मठांमध्येही पारंपरिक पध्दतीनं हा उत्सव साजरा करण्यात आला. तर विविध ठिकाणी भंडा-याचंही आयोजन करण्यात आलं होतं. दत्तजयंतीचा उत्सव काहीजण घरातही साजरा करतात. ठाण्यातील विठ्ठल सायन्ना दत्तमंदिर, चव्हाण दत्त मंदिर, चेंदणी कोळीवाड्यातील दत्तमंदिर आणि कौपिनेश्वर येथील दत्तमंदिरात हजारो भाविकांनी श्री गुरूदत्तांचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्याचं दिसत होतं.