कोलबाड सार्वजनिक मंडळाच्या शेडवर झाड कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू

कोलबाड येथे कोलबाड मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाच्या शेडवर अनंत चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी सुटणाऱ्या सुसाट्याच्या वाऱ्यामुळे धोकादायक झालेले पिंपळाचे झाड कोसळून अर्पिता वालावलकर  या महिलेचा दुर्दैवी मृत्यु झाला असून तिच्यासोबत प्रतिक वालावलकर(वय ३०), सुहासिनी कोलुंगडे (वय ५६), किविन्स परेरा (वय ४०) दत्ता जावळे (वय ५०) कु. चईत राघवेंद्र राव (वय १७) हे किरकोळ जखमी असून चुवारी केदार कनोजिया (वय ५५) व लालचंद गौंड (वय ६६) हे जखमी झाले असुन त्यांच्यावर वेलनेस हॉस्पिटल, कोलबाड येथे उपचार सुरु करण्यात आले आहेत.
ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी प्रत्यक्ष जागेवर भेट घेऊन जखमींना उपचाराकरिता हॉस्पिटल मध्ये दाखल केलेले आहे. यासंदर्भात खासदार विचारे यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त शर्मा व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनाकडून 30 लाखाची मदत करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. तसेच या घटनेत बेजबाबदार वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी या पत्रामध्ये करण्यात आली आहे. या पत्रामध्ये कोलबाड येथील सृष्टी को. ऑप. हौ. सोसायटी यांनी ठाणे महापालिका आयुक्त व वरिष्ठ उद्यान वृक्ष अधिकारी यांना सदर पिंपळाचे झाड उंच असल्याकारणाने झाडाच्या फांद्या छाटणे हे काम जोखमीचे असल्याने सोसायटीकडे कुठल्याही प्रकारची यंत्रणा उपलब्ध नसल्याचे कळविण्यात आले होते. तसेच या पिंपळाच्या झाडापासुन मनुष्यहानी होवू नये यासाठी झाडाच्या फांद्या छाटुन किंवा महापालिकेच्या यंत्रणामार्फत मुळासकट उपटुन काढण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली होती. यापैकी पहिला अर्ज दि. २४ मे २०२१, दुसरा अर्ज दि. १२ जानेवारी २०२२, तिसरा अर्ज दि. २४ मार्च २०२२, चौथा अर्ज दि. ०७ जुलै २०२२ रोजी करण्यात आला होता. परंतु या ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांनी याकडे दर्लक्ष केल्यामुळे सदर पिंपळाचे झाड कोलबाड मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपाच्या शेड वर पडून  अर्पिता राजन वालावलकर महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे. यापुर्वी उदयनगर, पाचपखाडी येथेही अशीच घटना घडली होती. सोसायटीने वारंवार ठामपाकडे तक्रार करूनसुध्दा महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे सोसायटीच्या हद्दीत असणारे झाड कोसळुन स्व. किशोर पवार (वय ४०) या व्यक्तीलाही आपला प्राण गमवावा लागला होता. व त्यानंतर महापालिकेला जाग येऊन ठाणे महानगरपालिकेने त्या व्यक्तीच्या पत्नीला महानगरपालिकेच्या सेवेत रुजू करुन घेतले.याची आठवण करून दिली अशा घटना वारंवार घडत असल्याने संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जेणेकरुन सोसायटी धारकांनी केलेल्या अर्जाची तात्काळ दखल घेवून पुढील होणारी मनुष्य हानी टाळता येईल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading