५ बंधारे आणि हुमायून बंधा-याच्या बांधकामाचा श्रीगणेशा

येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पावसाळ्यात तेथील ओढ्यामधून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा सदुपयोग करण्यासाठी ५ ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि ब्रिटिशकालीन हुमायून बंधाऱ्याची पुर्न:बांधणी करण्याच्या कामाचा शुभारंभ आज आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आणि जलसंधारण विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला. हे बंधारे एक वर्षाच्या कालावधीत बांधण्याचे नियोजन करण्यात आले असून येऊरच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी पोहोचविण्यासाठी महापालिकेच्या वतीने स्वतंत्र वितरण व्यवस्था तयार करण्यात येणार आहे. या बंधाऱ्यामुळे पुढील वर्षांपासून महापालिका क्षेत्राला ३ ते ४ एम.एल.डी. पाणी यातून उपलब्ध होईल अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
येऊरमधील ब्रिटीशकालीन हुमायून बंधा-याच्या पुर्न:बांधणीसाठी १७ लाख ८० हजार खर्च अपेक्षित असून बाकी ५ नवीन बंधा-यांसाठी २ कोटी ६० लाख असे एकूण २ कोटी ७७ लाख खर्च येणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली असून पुढील सहा महिन्यामध्ये हे काम पुर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
गेल्या अनेक वर्षापासून संजय राष्ट्रीय उद्यानातून वाहून येणारे पाणी तसेच येऊरला नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत असलेले हे स्वच्छ पाणी सर्व खाडीला जाऊन मिळत असल्याकारणाने ते पाणी वाया जात होते. त्यासाठी येऊर परिसरातील असलेला हुमायून धबधबा आणि अन्य धबधब्यांवर जलसंधारण विभागाकडून बंधारा बांधून जमा झालेले पाणी महापालिकेला मिळाल्यास आजूबाजूच्या परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. यासाठी ’पाणी अडवा-पाणी जिरवा“ या संकल्पनेनुसार सरनाईक शासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. या बंधा-यांमुळे येऊरसह शिवाईनगर, कोकणीपाडा, रामबाग, गावंडबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील जनतेला या पाण्याचा प्रश्न सुटेल. हे बंधारे बांधल्यावर पाणी साठविल्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीवांना वर्षभर पिण्याचे पाणी या बंधाऱ्यातून उपलब्ध होऊ शकेल. पाणी अडवा, पाणी जिरवा या धोरणेप्रमाणे नागरिकांना तर पाण्याचा फायदा होईलच पण, या परिसरातील वन्यजीवांच्या दृष्टीनेही हे बंधारे खूप उपयुक्त ठरतील असे मत प्रताप सरनाईक व्यक्त केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading