रस्ते सुरक्षा मोहिमेंतर्गत पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेवरही विशेष भर

वाहतूक पोलिस हे मुख्यतः वाहतुकीच्या नियमनासाठी असतात पण पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि त्यांना निर्वेध, सुरक्षित पद्धतीने रस्त्यांवरून चालता यावे, हे पाहणे देखील वाहतूक पोलिसांचीच जबाबदारी आहे. ही बाब अधोरेखित करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या रस्ते सुरक्षा मोहिमेंतर्गत वाहतूक पोलिसांनी पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेवरही विशेष भर देण्यात आला आहे. रस्त्यात वाट्टेल तशा उभ्या राहणाऱ्या रिक्षा, फेरीवाले, अरुंद, अतिक्रमित आणि उखडलेले फुटपाथ, अशा विविध कारणांमुळे या रस्त्यांवरून पादचाऱ्यांना निर्वेधपणे चालणे ही दुर्मीळ बाब झाली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला असून ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुले, दिव्यांग आणि अंध व्यक्तींना निर्धोकपणे रस्त्यावरून चालणे शक्य व्हावे, रस्ता ओलांडताना त्यांना कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी वाहतूक पोलिस मदत करत आहेत. याअंतर्गत रस्ते सुरक्षेसंदर्भात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा रोख सुरक्षित वाहतुकीवर आणि सुरक्षितपणे वाहन कसे चालवावे, याबाबत जनजागृती करण्यावर असला तरी पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडेही विशेष लक्ष दिले जात आहे, असे वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. रस्त्यांवर पहिला अधिकार हा पादचाऱ्यांचा असून नेमके याच बाबीकडे दुर्लक्ष केले जाते. अपघातात अनेकदा पादचाऱ्यांचा हकनाक बळी जातो. अशा अपघातांमध्ये अनेकदा त्यांचा काहीही दोष नसतो. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडेही विशेष लक्ष देण्याची गरजच नाही, तर ते आपले कर्तव्य आहे. यामुळेच पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांनी पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठीही सध्याच्या रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत विशेष उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. याअंतर्गत पादचाऱ्यांना रस्त्यांवरून निर्वेधपणे चालता यावे, त्यांना कुठल्याही अडथळ्यांना तोंड द्यावे लागू नये, त्यांना व्यवस्थित रस्ते ओलांडता यावेत, यासाठी प्रयत्न करतानाच ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुले तसंच दिव्यांगांना रस्ता ओलांडण्यासाठी वाहतूक पोलिस स्वतः मदत करत असल्याचं पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading