महापालिकेच्या मालकीच्या म्हाडा इमारतीतील रहिवाशांना मिळाली मालकी हक्काची घरे

महापालिकेच्या मालकीच्या म्हाडा इमारतीतील रहिवाशांना संगणकीय सोडतीच्या माध्यमातून पारदर्शीपणे सदनिकांचे वाटप काल करण्यात आले. वर्तकनगर येथील महापालिकेच्या मालकीच्या म्हाडा इमारत क्रमांक 54,55,56 या अतिधोकादायक इमारती महापालिकेच्या वतीने निष्कसित करण्यात आल्या होत्या. त्या जागेवर पी.पी.पी तत्वावर बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीतील सदनिकांची संगणकीय पध्दतीने काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सोडत काढण्यात आली. सोडतीच्या माध्यमातून पात्र सदनिका धारकांना सदनिकेची ताबा पावती आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते देण्यात आली. मालकी तत्वावरील कायमस्वरुपी सदनिका रहिवाशांना मिळाल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे आभार व्यक्त केले. वर्तकनगर येथील म्हाडाच्या इमारत क्रमांक 54,55,56 या इमारतीमध्ये ठाणे महापालिकेच्या विविध प्रकल्प आणि रस्तारुंदीकरणात बाधित झालेल्या रहिवाशांचे पुनर्वसन तसंच 57 महापालिका कर्मचारी राहत होते. या इमारती अतिधोकादायक झाल्याने त्या महापालिकेमार्फत निष्कसित करण्यात आल्या होत्या. या इमारतीची पुर्नबांधणी करुन तेथील बाधित आणि महापालिका कर्मचा-यांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आग्रही भूमिका होती. त्यानुसार या भूखंडावर पी.पी.पी. तत्वावर नव्याने इमारत बांधण्यात आली. या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये 130 पात्र बाधित सदनिकाधारकांना कायमस्वरुपी मालकी हक्काने आणि 57 महापालिका कर्मचाऱ्यांना सेवेत असेपर्यत तात्पुरत्या स्वरुपात सदनिका वितरीत करण्यात आल्या. अत्यंत पारदर्शीपणे संगणकीय पध्दतीने या सदनिकांची सोडत काढण्यात आली. पी.पी.पी तत्वावर बांधण्यात आलेल्या या इमारतीमध्ये ए आणि बी अशा दोन विंग असून एकूण 30 मजल्यांची इमारत आहे. इमारतीच्या ए आणि बी विंग मध्ये प्रत्येक मजल्यावर सहा सदनिका आहे. ए विंग मधील 23 व्या मजल्यापर्यतच्या 130 सदनिका या बाधित रहिवाशांना तर बी विंग मधील 10 मजल्यापर्यतच्या 57 सदनिका वितरीत करण्यात आल्या. 269 चौ.फूटाचे वनबीएचके अशा स्वरुपाच्या या सदनिका आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading