कौशल्य आणि जितो ट्रस्टच्या रूग्णालयात कोरोना रूग्णांवर विनामूल्य उपचार करण्याची नारायण पवारांची मागणी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने विनामूल्य भूखंड दिलेल्या कौशल्य रुग्णालय आणि जितो ट्रस्टच्या श्री महावीर जैन हॉस्पीटलमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर विनामूल्य अथवा नाममात्र दराने उपचार करावेत अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पीठाने काल केंद्र सरकारला दिलेल्या आदेशानुसार ज्या रुग्णालयांना सरकारने विनामूल्य किंवा नाममात्र दरात जमिनी दिल्या आहेत अशा खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर मोफत किंवा नाममात्र दरात उपचार करावेत असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. पाचपाखाडी येथील कौशल्य हॉस्पीटलला महापालिकेनं विनामूल्य भूखंड दिला होता. मात्र एखाद्या खाजगी रुग्णालयाप्रमाणे कौशल्य रुग्णालयाचा कारभार सुरूच असून कोरोनाच्या रुग्णांकडून अवाच्या सवा बिले उकळली जात आहेत. तर जितो एज्युकेशनल अॅण्ड मेडिकल ट्रस्ट आणि ठाणे महापालिकेचा जॉईंट व्हेंचर म्हणून लुईसवाडी येथे श्री महावीर जैन हॉस्पीटल उभारण्यात आले. त्यासाठी महापालिकेने इमारत दिली आहे. या हॉस्पीटलचे क्षेत्र २० हजार चौरस फूट असून, हॉस्पीटलमध्ये १०० हून अधिक रुग्णांची सोय होऊ शकेल असे नारायण पवार यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही हॉस्पीटलच्या व्यवस्थापनाला आदेश देऊन कोरोना रुग्णांवर विनामूल्य उपचाराची व्यवस्था करावी अशी मागणी नारायण पवार यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading