पोलीस स्थापना दिनाचं औचित्य साधून ठाणे पोलीसांनी सुमारे ५५ लाखांचा ऐवज तक्रारदारांना सुपुर्द केला. काल ६२४ ग्रॅम सोनं, २१ लाखांच्या दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचा यात समावेश होता. पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात हा ऐवज तक्रारदारांना परत करण्यात आला. पोलीस स्थापना दिनाचं औचित्य साधून मुद्देमाल अभिहस्तांतरण केलं जातं. ठाणे पोलीसांनी विविध गुन्ह्यातून एकूण ७ कोटी ५० लाखांच्या ऐवजापैकी ५ कोटींचा मुद्देमाल तक्रारदाराना यापूर्वीच परत केला आहे. यामध्ये साडेतीन किलोहून अधिक सोन्याचे दागिने, मोटार वाहन चोरीच्या गुन्ह्यातील २ कोटी ४५ लाखांच्या ७५ दुचाक्या, २७ तीनचाकी वाहनं तक्रारदारांना परत करण्यात आली. इतर चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करत ६९ इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि ९५ लाखांची रोकड तक्रारदार नागरिकांना परत करण्यात आली. हा सर्व ऐवज ठाणे नगर, नौपाडा, राबोडी, कळवा, मुंब्रा, डायघर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून हस्तगत करण्यात आला होता. नागरिकांनी सतर्कता बाळगल्यास चोरीच्या घटनांना आळा बसेल आणि पोलीसांनाही मदत होईल असं आवाहन यावेळी पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी केलं.
