विद्यार्थ्यांच्या बौध्दीक विकासासाठी त्यांना स्मार्ट बनवण्याकरिता ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या डीजी ठाणे स्मार्ट मुले प्रश्नमंजुषा स्पर्धेत मोठ्या गटात आर. एस. देवकर, इंग्रजी माध्यमाचा विपुल म्हात्रे आणि प्रियांका गुप्ता यांनी प्रथम तर लहान गटात न्यू होरायझन स्कूलच्या अद्वय झा आणि अक्षय मालहन यांनी प्रथम क्रमांक पटकावला. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात या स्पर्धेची अंतिम फेरी झाली. डीजी ठाणे स्मार्ट किडस् प्रश्नमंजुषा स्पर्धा ठाण्यातील १० ते १६ वर्ष वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली होती. या स्पर्धेत ४८ शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी या गटासाठी प्रत्येकी २ विद्यार्थी निवडण्यात आले होते. सहावी ते आठवी या लहान गटात न्यू होरायझन स्कूलनं प्रथम, एसएमजी विद्यामंदिरनं द्वितीय, डी.ए.व्ही. पब्लिक स्कूलनं तृतीय तर गौतम इंग्लिश स्कूलनं चतुर्थ क्रमांक पटकावला. नववी ते दहावी या मोठ्या गटात आर. एस. देवकरनं प्रथम, सेंट जॉन बापटिस्टनं द्वितीय, ज्ञानगंगा स्कूलनं तृतीय तर महापालिका माध्यमिक शाळा क्रमांक ४ नं चतुर्थ क्रमांक पटकावला. या स्पर्धेत शाश्वत विकास, आर्थिक विकास, शासकीय योजना तसंच चालू घडामोडींविषयीचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले होते. स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं तर सहभागी शाळांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
