सुगंधी उटणं लावून अभ्यंगस्नान आणि फटाक्यांच्या धुमधडाक्यात दिवाळी पाडवा साजरा

सुगंधी उटणं लावून अभ्यंगस्नान आणि फटाक्यांच्या धुमधडाक्यात देवदर्शन आणि फराळावर ताव मारत घरोघरी दिवाळी पाडवा साजरा झाला. घरचा पाडवा साजरा केल्यानंतर ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येनं देवदर्शनाला जातात. कौपिनेश्वर मंदिर, सिध्दीविनायक मंदिर, विठ्ठल सायन्ना दत्तमंदिर, चरईतील बाळ गणपती मंदिर अशा अनेक मंदिरांमध्ये लोकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. प्रामुख्यानं तरूण-तरूणींचा यात समावेश होता. देवदर्शन आटोपल्यावर अनेक नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसमवेत ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरात जाऊन फटाक्यांच्या आतिषबाजीचा आनंद लुटला. गुजराती संवत २०७४ आणि महावीर जैन संवत २५४३ चा प्रारंभ आज झाल्यानं गुजराती व्यापारी आणि नागरिकांनी सकाळीच पूजा-अर्चा करून नव्या वर्षाचं स्वागत केलं. गुजराती व्यापा-यांनी अगदी सकाळपासूनच आपली दुकानं उघडली होती. बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. विक्रम संवत् साधारण नाम संवत् २०७५ चा प्रारंभ या दिवसापासून होत आहे. या दिवशी श्री विष्णूने वामन बटूचे रूप घेतले आणि बलीकडे तीन पावले जमीन मागितली. एका पावलात पृथ्वी व्यापली. दुस-या पावलात स्वर्ग व्यापला. तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारताच बलीने आपले डोके पुढे केले. वामनबटूरूपी विष्णूने तिसरे पाऊल बलीच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात पाठवले. बलिप्रतिपदेच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पूर्वी गोकुळवासीयांचा असा समज होता की इंद्र पाऊस पाडतो. म्हणून ते इंद्राची पूजा करीत. परंतु भगवान श्रीकृष्णाने सांगितले की इंद्र पाऊस पाडीत नसून गोवर्धन पर्वत पाऊस पाडतो. म्हणून या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा करण्याची प्रथा पडली. या दिवशी गावातील प्रत्येक माणूस काहीतरी चांगला पदार्थ घेऊन मंदिरात जातो. सर्व पदार्थ एकत्र करून त्याचा नैवेद्य ईश्वराला अर्पण केला जातो. नंतर सर्व गावकरी एकत्र बसून सर्व पदार्थांचा आस्वाद घेतात. यालाच अन्नकूट म्हणतात. समतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम बर्याच मंदिरात चालू असतो. व्यापारी लोक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुजलेल्या हिशोबाच्या नवीन वह्या या दिवसापासून वापरण्यास प्रारंभ करतात.

Leave a Comment

%d bloggers like this: