सिगारेटचे पैसे मागितले म्हणून दुकानदाराची हत्या करणाऱ्या गणेश राऊत याला दोषी ठरवीत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला. गोपाल पांडे यांची 12 नोव्हेंबर 2013 रोजी लोकमान्यनगर परिसरात हत्या झाली होती. फिर्यादीच्या वतीने सरकारी वकील विनीत कुलकर्णी यांनी काम पाहिले. लोकमान्य नगरमध्ये पांडे यांचे किरणा दुकान असून ते आणि त्यांचा मुलगा हे दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. 21 जून, 2013 रोजी दुकानात सिगारेट घेण्यासाठी आलेल्या त्याच परिसरातील गणेश राऊत याच्याकडे पांडे यानी सिगारेटचे पैसे विचारले. तेव्हा गणेशने त्यांना शिविगाळ करून मारहाण केली होती. याबाबत पांडे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी गणेशला अटक केली होती. त्यानंतर जामिनावर सुटून आल्यानंतर 12 नोव्हेंबर 2013 रोजी नेहमीप्रमाणे पांडे यांनी दुकान उघडून मुलावर सोपवले आणि ते दुकानात लागणारा माल आणण्यासाठी बाजारात निघाले असतानाच दुकानापासून काही अंतरावर गणेशने पांडे यांच्यावर फावड्यासदृश्य शस्त्राने हल्ला केला. या हल्यानंतर रक्ताने माखलेल्या कपड्याने गणेश दुकानात आला आणि त्याने, तेरे बाप को मारा, अब तेरा नंबर अशी धमकी देवून त्यालाही मारहाण केली होती. आरोपीच्या धमकीनंतर काही वेळातच चुलत बहिण विजया आली आणि तिने जखमी अवस्थेत पडलेल्या गोपाल पांडे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान आरोपी गणेशने दिलेली धमकीची कबुली आणि तक्रारदार पांडे यांच्या कुटुंबियांची साक्ष न्यायालयात महत्वाची ठरली. या दाव्यात सरकारी वकिलाचे युक्तिवाद आणि साक्षी पुरावे पाहून न्यायमूर्ती जाधव यांनी आरोपी गणेश राऊत याला दोषी ठरवीत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
