दिवाळीच्या सणात एकीकडे फटाके, फराळ आणि डोळे दिपवणारी रोषणाई पहायला मिळत असताना दुसरीकडे मात्र या सा-या खर्चिक उपक्रमांना बगल देत ठाणे पूर्वेकडील श्रीपवनसुत सेवा प्रतिष्ठानचे बाल शिलेदार आगळ्या वेगळ्या प्रकारे दिवाळी साजरी करत आहेत. गेली २० वर्ष या मंडळाचे शिलेदार फटाके न फोडता दरवर्षी एक किल्ला पाहून त्याची हुबेहूब प्रतिकृती साकारतात. यंदा देखील या बाल चमूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी साकारून नव्या पिढीला स्वराज्याच्या इतिहासाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवनेरी किल्ल्याची ही प्रतिकृती सगळ्यांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे. दिवाळीमध्ये फटाके फोडल्यानं वायु प्रदूषण, ध्वनी प्रदूषण होत असल्यानं या विरोधात व्यापक जनजागृती होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर पवनसुत प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी गेली २० वर्ष आपला सामाजिक वसा जपला आहे. सणात फटाके न फोडता दरवर्षी एखादा तरी किल्ला पाहून पर्यटनाचा आनंद लुटताना दिवाळीत या किल्ल्याची प्रतिकृती साकारून इतिहासाची ओळख शहर वासियांना करून देतात. कोपरी रेल्वे स्थानकानजिक साडेचार फूट उंचीचा शिवनेरी किल्ला साकारण्यासाठी माती, दगड, सिमेंट आणि गेरूचा वापर करण्यात आला आहे. शिवनेरी गडावरील सर्व बारकावे दर्शवताना केलेली कलाकुसर वाखाणण्याजोगी आहे.
