शिवसेनेच्या एका महिला नेत्याची ठाण्यातील चौघांनी सुमारे ९ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. महिला उद्योजकांना अर्थसहाय्य करणा-या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ज्योती ठाकरे या अध्यक्षा आहेत. त्यांचा स्वत:चा पेट्रोलपंप तसंच इतर काही व्यवसाय आहेत. या व्यवसायांसाठी त्यांना ७ कोटी रूपयांच्या कर्जाची गरज होती. ठाण्यातील दोघांनी एका खाजगी संस्थेतून कर्ज मिळवून देण्याची तयारी दर्शवली. त्यापोटी ६० हजार रूपये घेतले. मात्र पैसे घेऊनही ज्योती ठाकरे यांना कर्ज काही मिळू शकलं नाही. त्यानंतर आणखी दोन व्यक्तींनी या प्रकरणात मदत करण्याचं दर्शवून त्यांच्याकडून जवळपास साडेआठ लाख रूपये घेतले. पण ते दोघेही कर्ज काही मिळवून देऊ शकले नाहीत. कर्ज मिळत नसल्यामुळं ज्योती ठाकरे यांनी या मंडळींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांना योग्य उत्तरं दिली नाहीत. त्यामुळं ज्योती ठाकरे यांनी या प्रकरणी काल नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी अमित कोळी, प्रशांत कदम, भालचंद्र पलवा आणि ओमकार हटले या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
