शहरातील हवेच्या गुणवत्तेत विशेषत: रहदारीच्या चौकांमधील प्रदूषण नियंत्रणाकरिता ठाणे महापालिका अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार आहे. महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रहदारीच्या चौकांमध्ये मिस्ट स्प्रे ही यंत्रणा बसवण्याचं प्रस्तावित केलं आहे आणि यासाठी अर्थसंकल्पात १ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हवेच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा मुख्य घटक म्हणजे धूलिकण असतात. रहदारीच्या चौकांमध्ये निर्माण होणा-या धूळ प्रदूषण नियंत्रणाकरिता ही अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाणार आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून रहदारीच्या चौकांमध्ये अतिसूक्ष्म पाण्याच्या थेंबांची फवारणी करून धूलिकण नियंत्रित केले जातात. ही यंत्रणा रहदारीच्या चौकाच्या ठिकाणी अतिशय कमी जागेत आणि रहदारीला अडथळा न होता उभारता येते. अशी मिस्ट स्प्रे यंत्रणा तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन, माजिवडा, कापुरबावडी आणि वाघबीळ येथील चौकात बसवली जाणार आहे. यामुळं सिग्नलसाठी थांबलेल्या वाहन चालकांना हवेत काहीसा गारवा आणि प्रदूषणातही फायदा होणार आहे.
