वाहतूक शाखेकडून लहान मुलांना हसत खेळत वाहतूक नियमनाचे धडे

नियमांची पेरणी कोवळ्या मनांवर जितक्या परिणामकारक होते तितकी ती परिस्थितीने घट्ट झालेल्या प्रौढ मनावर होत नाही हा निसर्गाचा नियम आहे. याच नियमाचा आधार घेऊन ठाण्याच्या वाहतूक शाखेनं आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. ट्रॅफीक अवेअरनेस प्रोग्रॅम अंतर्गत शाळकरी मुलांना वाहतुकीच्या नियमांची माहिती करून देण्याचा प्रयत्न वाहतूक शाखेनं सुरू केला आहे. ठाण्यातील १० विविध शाळांमधून ५०० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. यासाठी उपवन तलावाजवळ एक अनोखी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ५ निरनिराळे टप्पे ठेवण्यात आले होते. प्रत्येक टप्प्यावर मुलांना वाहतुकीचे नियम, वाहतुकीच्या खुणा, हेल्मेट का बाळगावे, दारू पिऊन गाडी का चालवू नये, रूग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी प्राधान्य कसे द्यावे, सिग्नलचा उपयोग, झेब्रा क्रॉसिंगचे फायदे या अशा अनेक नियमांवर स्पष्टीकरण देत होते. उपस्थित मुलंही या संवादाला आपुलकीने आणि आनंदाने प्रतिसाद देत होती. नंतर या मुलांसमोर करमणुकीचा कार्यक्रम सादर करण्यात आला. बोलका बाहुला आणि एक नृत्य सादर करण्यात आलं. या दोन्ही कार्यक्रमातून वाहतुकीच्या नियमांची माहिती मुलांना देण्यात आली. वाहतूक शाखेच्या या उपक्रमामुळे भविष्यातील चालक वाहतुकीच्या नियमांना योग्य तो न्याय देतील अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: