लव्ह जिहादचं उदात्तीकरण करणा-या केदारनाथ या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे. हिंदूंच्या श्रध्दास्थानांना पायदळी तुडवत लव्ह जिहादला प्रोत्साहन देणा-या केदारनाथ या चित्रपटावर बंदी घालणं, सनातनवरील बंदी आणि शबरीमला येथे ३ हजार भक्तांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ हिंदू जनजागृती समितीतर्फे काल ठाण्यात निदर्शनं करण्यात आली. यावेळी स्वाक्षरी अभियानही राबवण्यात आलं. केदारनाथ या आगामी चित्रपटाचे नाव, पोस्टर, ट्रेलर आणि टीझर यातून हा चित्रपट हिंदूद्रोही असल्याचं दिसून येत आहे. जनभावनांचा उद्रेक होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटावर बंदी घालावी, चित्रपटातील वादग्रस्त प्रसंग वगळून चित्रपट हिंदू संघटनांच्या शिष्टमंडळाला दाखवावा तसंच हिंदूंच्या भावना दुखवू नये यासाठी ही निदर्शनं करण्यात आली.
