शहरातील रूग्णवाहिकांना आता मनमानी दर आकारणी करता येणार नाही. प्रादेशिक परिवहन विभागानं रूग्णवाहिकांची दर निश्चिती करून दिली असून दरपत्रक रूग्णवाहिकांना रूग्णवाहिकेत लावणं बंधनकारक करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली. ठाणे आणि नवी मुंबई पालिका क्षेत्रासाठी मारूती व्हॅनच्या १० किलोमीटर करता ५०० रूपये, १० ते २० किलोमीटरसाठी १ हजार, २० ते ३० किलोमीटरसाठी दीड हजार तर ३० किलोमीटरच्या पुढे प्रति २० रूपये किलोमीटर असा दर आकारता येणार आहे. टाटा सुमो, मॅटेडोर साठी पहिल्या १० किलोमीटरकरिता ६००, १० ते २० किलोमीटरसाठी १२०० आणि ३० किलोमीटर पेक्षा जास्त प्रति २३ रूपये किलोमीटर आकारता येणार आहेत. वातानुकुलित वाहनांसाठी पहिल्या १० किलोमीटरला ७०० आणि ३० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराकरता प्रति किलोमीटर २५ रूपये दर आकारता येणार आहे.
