राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोज प्रधान यांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

वज्रेश्वरी देवी मंदिराच्या संस्थानाची सुमारे सव्वातीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थानाचे माजी अध्यक्ष मनोज प्रधान यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सध्या याप्रकरणी तपास सुरू आहे. वज्रेश्वरी योगिनीदेवी संस्थानावर मनोज प्रधान यांची नियुक्ती झाली होती. २०१४-२०१७ या काळात त्यांनी संस्थानचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. या काळात विविध बँकांमध्ये गुंतवणूक स्वरूपात ठेवी ठेवल्या होत्या. मुलुंड येथील कॉर्पोरेशन बँकेच्या शाखेत ठेवण्यात आलेल्या ८ मुदत ठेवींची मुदत संपल्यानंतर व्याजासह मिळालेली रक्कम पुन्हा बँकेत गुंतवल्याचं दाखवून मनोज प्रधान यांनी त्याच्या पावत्या संस्थानात जमा केल्या होत्या. मात्र या कागदपत्रांबाबत संशय आल्यानं विद्यमान अध्यक्ष कल्पेश पाटील यांनी बँकेत चौकशी केली असता बँकेत संस्थानाच्या ठेवीच नसल्याचं उघड झालं. याप्रकरणी कल्पेश पाटील यांनी गणेशपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे मनोज प्रधान यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading