राबोडी परिसरातील पंचगंगा सोसायटीच्या आवारात असलेली ओमसूर्या ही तीन मजली इमारत काल खचल्यानं खळबळ उडाली आहे. पंचगंगा सोसायटीतील ही इमारत ४० वर्ष जुनी आहे. पालिकेनं जाहीर केलेल्या धोकादायक इमारतींच्या यादीत या सोसायटीचं नाव नव्हतं. काल रात्री ८ च्या सुमारास इमारतीचा काही भाग खचत असल्याचं स्थानिकांच्या लक्षात आलं त्यामुळं संभाव्य धोका ओळखून इमारतीतील रहिवाशांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं. या सर्वांची तात्पुरती सोय जवळच्या शाळेत करण्यात आली होती. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलानं या इमारतीतील ५७ कुटुंबांना सुखरूप बाहेर काढलं असून या सर्वांना भाईंदरपाडा येथील लोढा रेंटल इमारतीमध्ये स्थलांतरीत केलं जाणार आहे. इमारत खचत असल्याचं वेळीच लक्षात आल्यामुळं पुढील संभाव्य अनर्थ टळला. महापौरांसह पालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी भेट देऊन या इमारतीची पाहणी केली.
