राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या नावाने देणग्या मागून फसवणूक

खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या नावाने देणग्या मागण्याचा प्रकार घडला असून पोलीसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी बालदिनानिमित्त ५० दिव्यांगांना चाकाच्या खुर्च्या वाटण्याचा कार्यक्रम मासुंदा तलाव येथे होणार असून यासाठी एका मटण विक्रेत्याला या दोघांच्या नावाने दूरध्वनी आला. मी खासदार राजन विचारे बोलतोय या कार्यक्रमासाठी १२ हजार रूपये देणगी हवी असून आपला मनुष्य ती घेण्यासाठी येत असल्याचं दूरध्वनी करणा-या व्यक्तीनं सांगितलं. दूरध्वनी करणा-या व्यक्तीनं आपण शाखा प्रमुख नव्हे तर खासदार बोलतोय असंही सुनावलं. आमदार प्रताप सरनाईक यांच्या नावानंही असाच दूरध्वनी करण्यात आला. आपण प्रताप सरनाईक बोलत असून दिव्यांगांना सायकली देण्यासाठी देणगी द्यावी असं दूरध्वनी करणा-या व्यक्तीनं सांगितलं. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तक्रारदारांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क साधला. या नेत्यांनी दूरध्वनी करणा-या व्यक्तीशी संपर्क साधला त्यावेळी त्याने असे कार्यक्रम होणार असून यासाठी देणगी हवी असल्याचं सांगितलं. मात्र यावर संशय आल्यानं ही सर्व मंडळी खासदार राजन विचारे यांच्या कार्यालयात चौकशीसाठी गेली. त्यावेळी विचारे यांच्या कार्यालयानं असा कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नसल्याचं स्पष्ट केलं आणि कोणीतरी याप्रकरणी फसवणूक करत असल्याचं सांगितलं. कासारवडवली पोलीसांनी याप्रकरणी फसवणुकीच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला असून ते अधिक चौकशी करत आहेत.

 

Leave a Comment

%d bloggers like this: