येत्या सोमवारी म्हणजे ४ फेब्रुवारीला पौष अमावास्या असून पौष अमावास्येला मौनी अमावास्याही म्हटलं जातं. ही मौनी अमावास्या जर सोमवारी आली तर तो दुर्मिळ आणि महत्वाचा योग मानला जातो अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. मौनी अमावास्येला मौन पाळून गंगास्नान करणे विशेष महत्वाचे मानले जाते. वाणीच्या संयमाला मौन म्हणतात. जे वाणीवर संयम ठेवतात त्यांना मुनी म्हणतात, मौन म्हणजे न बोलणे तर वाणीवर संयम म्हणजेच मौन. वाणीवर संयम ठेवण्यासाठी मनावर संयम असावा लागतो म्हणून आधुनिक वैज्ञानिक काळातही मौनव्रताची आवश्यकता असल्याचं सोमण यांनी सांगितले. मौन व्रत हे केवळ मौनी अमावास्येला न करता आयुष्यभर करायला हवे त्यामुळे माणसाला अंतर्मुख करता येतं. रक्तदाब, मधुमेहासारख्या आजारावर नियंत्रण ठेवता येतं. बोलून विचारात पडण्यापेक्षा बोलण्यापूर्वी विचारात पडणे जास्त चांगले असते. संयमानं बोलणा-यांना इतर लोकं मान देत असतात. अशा व्यक्तीचे बोलणे नीट लक्ष देऊन ऐकत असतात. हिंदू धर्माप्रमाणे जैन धर्मातही मौनाला विशेष महत्व देण्यात आलेलं आहे असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.
