येत्या शनिवारी लिओनीड उल्का वर्षाव निरिक्षण करण्याची संधी

येत्या शनिवारी म्हणजे १७ नोव्हेंबर रोजी सिंह राशीतून मघा नक्षत्रातून लिओनीड उल्का वर्षाव निरिक्षण करण्याची संधी खगोल प्रेमींना मिळणार आहे. ही माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. हा उल्का वर्षाव पृथ्वी टेंपल टटल या धूमकेतूच्या मार्गातून जात असल्यामुळे होतो. टेंपल आणि टटल या दोघांनी हा धुमकेतू १९ डिसेंबर १८६५ मध्ये शोधला. हा धुमकेतू दर ३३ वर्षांनी सूर्याभोवती प्रदक्षिणा करतो. पृथ्वी सूर्याभोवती दर सेकंदाला ३० किलोमीटर या वेगानं भ्रमण करत असताना ज्यावेळी या धुमकेतूच्या मार्गात येते त्यावेळी धुमकेतूच्या मार्गात असलेले धूलीकण पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणामुळे खेचले जातात. हे धूलिकण जेव्हा पृथ्वी सभोवतालच्या वातावरणात शिरतात तेव्हा वातावरणातील रॅम दाबामुळे जळून जातात. त्यामुळं उल्कांची प्रकाशित रेषा आपणास दिसते. हे धूलिकण ७५ ते १०० किलोमीटर उंचीवर दर सेकंदास ३२ किलोमीटर या वेगानं वातावरणात शिरतात. हा उल्कावर्षाव शनिवारी उत्तररात्री म्हणजे रविवारी पहाटे अडीच-तीन वाजल्यापासून ईशान्य आकाशात सिंह राशीतील मघा नक्षत्रात पाहता येईल. तासाला १२ ते १५ उल्का पडताना दिसतील असंही दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. यानंतर २० मे २०३१ मध्ये टटल धुमकेतू सूर्यापाशी येणार आहे. त्यामुळे १७ नोव्हेंबर २०३१ रोजी तसा महा उल्का वर्षाव दिसण्याची शक्यता असल्याचंही दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

 

Leave a Comment

%d bloggers like this: