युवा माहिती दूत या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थेट खेडोपाडी जाऊन लोकांना शासनाच्या योजना समजावून सांगण्याची संधी मिळणार आहे. त्यादृष्टीनं विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिका-यांनी ही सामाजिक जबाबदारी योग्यत-हेनं पार पाडावी असं आवाहन जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी केलं. जिल्हा माहिती कार्यालय, राष्ट्रीय सेवा योजना ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित युवा माहिती दूत कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना नाईक यांनी हे आवाहन केलं. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिका-यांनी आपल्या महाविद्यालयात या ॲप्लीकेशन विषयी विद्यार्थ्यांना माहिती द्यावी तसंच सामाजिक जबाबदारीत आपण मागे नाही हे दाखवून द्यावं असं सांगितलं. उत्कृष्ट काम करणारी महाविद्यालयं आणि कार्यक्रम अधिका-यांना गौरवलं जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. युवा माहिती दूत या उपक्रमाविषयी जिल्हा माहिती अधिकारी अनिरूध्द अष्टपुत्रे यांनी तपशीलवार विवेचन केलं. जनसंपर्क महासंचालनालयानं तयार केलेल्या तीन चित्रफीतींद्वारे या उपक्रमाची माहिती देण्यात आली. शेतकरी, महिला, आदिवासी, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती-जमाती, ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील विविध घटकांसाठी शासन राबवत असलेल्या वैयक्तीक लाभाच्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्य म्हणून द्यावी अशी ही योजना आहे. युवा माहिती दूत झालेल्या युवकानं सहा महिन्यात ५० घरी जाऊन त्या कुटुंबाला लागू होतील अशा योजनांची माहिती द्यायची आहे. राज्यातील १ लाख विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. या विद्यार्थ्यांना शासनाचे माहितीदूत म्हणून ओळख आणि प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.
