मेट्रोसाठी काम करणा-या विविध यंत्रणांनी एकाचवेळी काम करण्याचं पोलीसांचं आवाहन

मेट्रोचं काम करताना एका यंत्रणेस खोदण्यासाठी ना-हरकत दिल्यानंतर इतर यंत्रणांनीही त्याच वेळेस आपली कामं करावीत. वेगवेगळ्या यंत्रणांना वेगवेगळ्या वेळी एकाच रस्त्यावर खोदकामाची ना-हरकत दिली जाणार नाही असा इशारा आज एका बैठकीत देण्यात आला. मेट्रो-४ चं काम घोडबंदर रस्त्यावर सुरू करण्यात आल्यामुळं सध्या या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयात सर्व संबंधित यंत्रणांच्या झालेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला. मेट्रो-४ चे खोदकाम करताना हे काम टप्प्याटप्प्यानं करावं आणि एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुस-या टप्प्याचं काम सुरू करताना वाहतूक अधिका-यांशी समन्वय ठेवावा. मेट्रो-४ चं काम करताना ट्रॅफीक वॉर्डन, इलेक्ट्रीक बॅटन, रिफ्लेक्टीव्ह जॅकेटस्, बॅरिकेटस्, डायव्हर्जन बोर्ड आदी साधनसामुग्री वाहतूक विभागास त्वरीत उपलब्ध करून द्यावी, मेट्रोचं काम एका दिवशी जेवढे केले जाते तेवढ्याच लांबीचे बॅरिकेट्स लावावेत अशा विविध सूचना या बैठकीत करण्यात आल्या. या बैठकीला महावितरण, सार्वजनिक बांधकाम खातं, मुंबई महानगर विकास प्राधिकरण, महानगर गॅस, रिलायन्स, टाटा आणि मेट्रो-४ चे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

%d bloggers like this: