मुरबाड तालुक्यातील शेतक-याला पंतप्रधानांच्या हस्ते सन्मानपत्र

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ उत्तरप्रदेशमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते काल झाला. यावेळी जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील अल्याणी गावचे गौतम पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे सन्मानपत्र स्वीकारले. महाराष्ट्रातून या कार्यक्रमासाठी निवड झालेले ते एकमेव शेतकरी आहेत. जिल्ह्यातील या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी १३ शेतक-यांचा प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्ह्याच्या ६ तालुक्यांमधील ९५४ गावांमधून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी वेगानं पूर्ण होत असून परिशिष्ट अ प्रमाणे सध्या ७१ हजार ६९७ पात्र शेतकरी कुटुंबं असून या सर्वांची नोंद झाली आहे. ज्या शेतक-यांची या योजनेत नोंद झाली नाही अशा शेतक-यांनी कागदपत्रांसहीत गावचे तलाठी, कृषी सहाय्यक अथवा ग्रामसेवकांकडे आपली कागदपत्रं सादर करावीत असं आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी बोलताना केलं. शेतकरी कर्जमाफी, किसान सन्मान निधी, सॉईल कार्ड, पीक विमा अशा विविध योजनांचा लाभ शेतक-यांना मिळत असल्यानं शेतक-यांमध्ये विश्वास निर्माण होत आहे असं पालकमंत्र्यांनी सांगितलं. समृध्दी महामार्गाजवळ कृषी समृध्दी केंद्र उभारली जाणार असून त्याचाही फायदा शेतक-यांना होणार आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून बारमाही शेती शक्य आहे अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

%d bloggers like this: