मुंब्र्यातील पारसिक बोगदा हा लवकरच पर्यटन स्थळ होणार आहे. मध्य रेल्वेच्या जलद गती मार्गावर पारसिक बोगदा असून हा बोगदा १०२ वर्ष जुना आहे. सध्या हा बोगदा कच-यानं भरून गेला आहे. डोंगरावर राहणा-या रहिवाशांच्या कच-यानं बोगदा आणि आजूबाजूचा परिसर कच-यानं भरून गेला होता. या ठिकाणी जवळपास ११० टन कचरा साठला आहे. महापालिका आयुक्त संजीव यांनी पारसिक बोगद्याचा परिसर स्वच्छ करण्याचे आदेश दिले असून गेले काही दिवस महापालिकेतर्फे हा कचरा काढण्याचं काम सुरू आहे. यासाठी अत्याधुनिक यंत्रणा लावण्यात आली आहे. पारसिक बोगद्याच्या वर असलेल्या भास्करनगर आणि विठोबानगर येथील कचरा काढण्याचं काम सुरू असून आत्तापर्यंत ७० टन कचरा काढण्यात आला आहे. उर्वरीत ६० टन कचरा येत्या २ ऑक्टोबर पर्यंत पूर्णपणे उचलला जाणार आहे. भास्करनगर आणि वाघोबानगरला जोडणारा पारसिक बोगदा हा महत्वाचा दुवा आहे. या ठिकाणी झोपडपट्टींचं साम्राज्य आहे. या ठिकाणी आता उद्यानाची निर्मिती केली जाणार असून रेल्वेतून जाणा-या प्रवाशांना येथे बघितल्यावर समाधान मिळणार आहे. या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यासाठी रेल्वेला सांगितलं जाणार आहे. काल महापालिका आयुक्तांनी या कामाची भेट देऊन पाहणी केली. यावेळी ३०० विद्यार्थ्यांसह पालिका आयुक्तांनी ४०० रोपांची लागवड केली. स्थानिक लोकांनी या परिसराला रंगरंगोटी केली असून कच-याचं आगार असलेला हा परिसर आता हळूहळू पर्यटन स्थळात बदलत आहे. या ठिकाणी उद्यानाची निर्मिती करण्याबरोबरच परिसराच्या विकासासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
