मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात दुचाकी लांबवणा-या नासीर खान या चोरट्याला कासारवडवली पोलीसांनी अटक केली आहे. विक्रोळीत राहणा-या नासीर खानकडून चोरीच्या ११ दुचाकी, ३ मोबाईल अशी सामुग्री हस्तगत करण्यात आली आहे. नासीर विरोधात एकट्या मुंबईतच ३९ दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. कासारवडवली परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या प्रकारात वाढ झाली होती. त्यामुळं दुचाकी चोरट्यांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश पोलीस उपायुक्तांनी दिले होते. नासीर खान हा अट्टल दुचाकी चोरटा असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांना मिळाली होती. त्यानुसार हिरानंदानी स्कूलसमोर दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात संशयास्पदरित्या फिरताना नासीरला पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडून कासारवडवलीतील ७, मुंबईतील १ तर ठाण्यातील ३ अशा ११ दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
