मानपाडा उड्डाण पूलावरील दुभाजकाला भरधाव कार धडकून दोघे ठार तर ४ जण गंभीर जखमी

चालकाचं नियंत्रण सुटल्यानं घोडबंदर रस्त्यावरील मानपाडा उड्डाण पूलावरील दुभाजकाला भरधाव कार धडकून दोघे ठार तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातग्रस्त कारमधील सहाही जण मद्यधुंद अवस्थेत होते. याप्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चितळसर मानपाडा येथील अंकुश चांदवडे आणि अर्जुन पारधी हे दोघे या अपघातात मृत झाले असून संजीव जैस्वाल, दीपक कांबळे, जगदिश सलुजा आणि शैलेश पाटील हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शैलेश पाटील हा खाजगी टॅक्सी चालवण्याचं काम करतो. बुधवारी रात्री त्याच्या टॅक्सीमधून हे सर्वजण फिरण्यासाठी गेले होते. त्यानंतर हे सर्वजण पुन्हा मानपाडा येथे परतत होते. त्यावेळी मानपाडा उड्डाणपूलावरील दुभाजकाला कार आदळल्याने चालकाचं नियंत्रण सुटून कार उड्डाणपूलाच्या कठड्यावर आदळली. त्यामुळं कारचा मागील दरवाजा आणि मागील दोन्ही चाके तुटून पडल्यानं अंकुश आणि अर्जुन यांचा जागीच मृत्यू झाला.

Leave a Comment

%d bloggers like this: