मागास हिंदू आघाडी राम मंदिर उभारेल अशी घोषणा हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. निवडणुका आल्या की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला राम मंदिराची आठवण येत असते. पण राम आणि हनुमान ही बहुजनांची दैवते आहेत. त्यामुळे आम्हीच रामाचे मंदिर उभारणार आहोत त्यासाठी आम्ही मागास हिंदू आघाडीची स्थापना करत आहोत अशी घोषणा आमदार हरिभाऊ राठोड यांनी एका पत्रकार परिषदेत केली. राम मंदिर बांधायच्या घोषणा कितीही जणांनी केल्या असल्या तरी आमच्या बहुजनांशिवाय हे मंदिर उभेच राहू शकत नाही. आमचे हात लागले तरच या मंदिराची उभारणी होणार आहे. त्यामुळेच आम्ही मागास हिंदू आघाडीच्या माध्यमातून राम मंदिराची उभारणी करणार आहोत. राम मंदिरासाठी आम्ही सर्व आघाड्यांवर लढा देणार आहोत असं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, मराठ्यांना देण्यात आलेले १६ टक्के आरक्षण हे नियमबाह्य आहे. त्यांची लोकसंख्या अवघी साडेसात टक्के असताना त्यांना १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय चुकीचा आहे. बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाला आव्हान दिलं आहे. यासंदर्भात आपण न्यायालयात बाजू मांडणार आहोत असंही हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं.
