मागण्या मान्य न झाल्यास बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा इशारा

आपल्या मागण्या मान्य न झाल्यास बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी यापूर्वी आंदोलन करूनही दखल न घेतली गेल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन छेडलं. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून आपल्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर १२वी परीक्षेच्या सर्व कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ठाणे पालघर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेनं दिला आहे. राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीनं गेली साडेचार वर्ष कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चे आंदोलनं केली जात आहेत. मात्र शिक्षकांच्या या मागण्यांकडे शासनानं लक्ष दिलेलं नाही. शासनासोबत झालेल्या बैठकांमध्ये वारंवार लेखी, तोंडी आश्वासनं दिली जात असल्यानं शिक्षकांमध्ये असंतोष आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी धरणं आंदोलन करत आपल्या विविध मागण्यांचा पुनरूच्चार केला. वेतन आयोगाची ग्रेड पे सुरू करून शिक्षण सेवक, सहाय्यक शिक्षक योजना रद्द करावी, माहिती तंत्रज्ञान विषय अनिवार्य करून अनुदानित करावा, शिक्षकांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करावे अशा शिक्षकांच्या मागण्या आहेत.

Leave a Comment