महाराष्ट्र सदन सुंदर मात्र बांधकाम करणारा अंदर – छगन भुजबळ

महाराष्ट्र सदन बांधणा-या कंत्राटदाराला अजून एक रूपया मिळाला नाही. तेव्हा जर कंत्राटदाराला पैसाच मिळाला नाही तर तो मंत्र्याला काय देणार, महाराष्ट्र सदनाचा उपयोग पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून काँग्रेसच्या राहुल गांधींपर्यंत सर्वजण करतात. अमित शहा तर महाराष्ट्र सदनातच दिसतात. असं असताना महाराष्ट्र सदन सुंदर मात्र बांधकाम करणारा अंदर असे म्हणण्याची वेळ आली आहे असे विधान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ठाण्यात केलं. अखिल भारतीय माळी संघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र सदन प्रकरणात मला अटक झाली मात्र ज्यांनी मला अटक केली त्यांनाच मला अटक का करण्यात आली याची माहिती नाही अशी टीकाही भुजबळ यांनी केली. दाभोळकर, पानसरे प्रकरणाबाबत सरकार गंभीर नसून पूर्वी आरोपी सापडत नव्हते आता आरोपी सापडलेत तर आरोपपत्र दाखल केलं गेलं नाही आणि सगळ्यांना सोडावं लागलं ही दुर्दैवी बाब असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. आरोपींना शिक्षा व्हावी ही शासनाची इच्छा आहे की नाही हे आता स्पष्ट झाल्याची टीका भुजबळ यांनी यावेळी केली. सध्या मनुस्मृतीने डोकं वर काढलं असून आपण याचं दहन केलं पाहिजे. आपण थोर पुरूषांची पूजा करत असून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवले पाहिजेत असंही छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.

 

Leave a Comment

%d bloggers like this: