महिला बालकल्याण योजनांतर्गत ठाणे महापालिकेतील महिला नगरसेवकांनी उदयपूर, राजस्थान आणि माऊंट अबू येथे एक अभ्यास दौरा केला. या ४ दिवसांच्या अभ्यास दौ-यामध्ये महापौर मिनाक्षी शिंदे यांच्यासह ४२ महिला नगरसेविका आणि महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, उप समाजविकास अधिकारी दशरथ वाघमारे सहभागी झाले होते. या अभ्यास दौ-यादरम्यान महिला नगरसेविकांना अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे समन्वयक लक्ष्मण लटके, अनिल आळे आणि निधी लोके यांनी सभाशास्त्र, महापालिकेचा अर्थसंकल्प, महिला आणि बालकल्याण योजना आणि अनुषंगाने असलेल्या अर्थसंकल्पाची तसंच अर्थसंकल्पात तरतूद कशी करावी याबाबत मार्गदर्शन केलं. या अभ्यास दौ-यात उदयपूर महापालिकेस भेट देण्यात आली. यावेळी उदयपूरचे महापौर चंद्रसिंग कोठारी यांनी मार्गदर्शन केलं. तर महापौर मिनाक्षी शिंदे यांनी ठाणे महापालिकेतर्फे राबवल्या जात असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. या अभ्यास दौ-यात माऊंट अबू येथील नगर परिषदेसही भेट देण्यात आली. माऊंट अबू येथील प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयासही भेट देण्यात आली. या आश्रमाचे प्रमुख बी. के. शशिकांत यांनी आश्रमद्वारे चालवण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसंच हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात मनाच्या शांतीबाबत आत्मदर्शन, परमात्म दर्शन आणि विश्वदर्शन करून जीवनात संपूर्ण शांती, समाधान आणि मानसिक सुख मिळवून देणा-या महत्वपूर्ण मुद्यांचे महत्व प्रतिपादित करीत मार्गदर्शन केले.
