मल्लखांब स्पर्धेत पी. इ. सो. द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमीच्या अ संघाला सांघिक विजेतेपद

ठाण्यात झालेल्या मल्लखांब स्पर्धेत पी. इ. सो. द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमीच्या अ संघाने सांघिक विजेतेपद पटकावले. सात वर्षांच्या चिमुरड्यापासून ते पंचविशीपर्यंतच्या तरुणाईनेमल्लखांबावर सादर केलेली लवचिकता, चपळाई आणि पदन्यासाबरोबरच चित्तथरारक कसरतींनी ठाणेकर प्रेक्षकांची मने जिंकली. ठाणे जिल्हा मल्लखांब संघटना आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या समन्वय प्रतिष्ठानतर्फे काल झालेली स्पर्धा उत्तरोत्तर रंगत गेली. आगामी काळात दरवर्षी कोकणातील एका जिल्ह्यात मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा घेण्याचे निरंजन डावखरे यांनी जाहीर केले. पुलवामात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहून मल्लखांब स्पर्धा जवानांना समर्पित करण्यात आली. त्यानंतर रंगलेल्या चुरशीच्या स्पर्धत जिल्ह्यातील १३० खेळाडूंनी हजेरी लावली होती. मुलांनी लाकडी मल्लखांब आणि मुलींनी दोरीच्या मल्लखांबावर विविध कसरती सादर केल्या. अर्चिता मोकल, दिव्या भोईर, स्वयंम ठाणेकर, ओंकार अणसूरकर, किशोर म्हात्रे आदी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या कसरतींना प्रेक्षकांची वाहवा मिळाली. हाताच्या बोटापासून शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत व्यायाम देणारा हा एकमेव क्रीडा प्रकार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अद्यापी मल्लखांबचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यासाठी आमदार डावखरे यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी केले. मल्लखांब लोकप्रिय करण्यासाठी ठाण्यात स्पर्धा भरविण्यात आली होती. मराठमोळ्या मल्लखांबकडे अधिकाधिक तरुण-तरुणींनी वळावे, हा उद्देश ठेवण्यात आला आहे. त्यादृष्टीने कोकणात यापुढे एका जिल्ह्यात मल्लखांब स्पर्धा भरविण्यात येईल. त्यानंतर ठाण्यात कोकण विभागीय स्पर्धा आयोजित करू असे आमदार डावखरे यांनी जाहीर केले. या स्पर्धेत येऊरच्या एकलव्य अकादमीने द्वीतीय आणि द्रोणाचार्य अकादमीच्याच ब संघाला तृतीय पुरस्कार मिळाला.

Leave a Comment

%d bloggers like this: