मतदान प्रतिनिधींसह मतदान यंत्रांवर बारीक नजर ठेवण्याचे शरद पवार यांचं आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन

गणेश नाईक यांनी नवी मुंबईला विकसीत केले आहे. त्यांनी अखंड काम केले आहे. तरीही त्यांचा मागील निवडणुकीमध्ये पराभव झाला. त्यामुळे त्यांचा पराभव हा मतदान यंत्रातील गडबडीमुळेच झाला असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मतदान प्रतिनिधीसह मतदान यंत्रावर बाराकाईने लक्ष ठेवावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले. शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमधून काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्याचा मंत्र दिला. ठाणे लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत संजीव नाईक यांचा पराभव झाला होता. संजीव नाईक हे जागरुक सदस्य होते. संसदेत त्यांनी मांडलेले मुद्दे आपण स्वत: पाहिलेले आहेत. तरीही, आपण कुठे तरी कमी पडलो आहोत, याचा विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नवी मुंबईला गणेश नाईक यांनी आदर्श शहर केले तरीही अशा व्यक्तीचा पराभव होण्यामागे मतदान यंत्रातील गडबडी हेच कारण आहे. सहा महिन्यापूर्वी गोंदिया- भंडारा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत 700 बूथवरील मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाला होता. कोणालाही मत दिले तर ते ठराविक चिन्हालाच जात होते. ही बाब तत्कालीन उमेदवार कुकडे यांनी सांगितल्यानंतर आपण निवडणूक अधिकार्‍यांशी बोलून मतदान यंत्रे बदलून वेळ वाढवून घेतली. त्यानंतर झालेल्या मतदानात कुकडे हे विजयी झाले. त्यामुळे आपण कार्यकर्त्यांनी मतदान यंत्रावर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.आपला पराभव केवळ मशीनमधील गडबडीमुळेच होऊ शकतो. त्यासाठी मतदानाच्या दिवशी सकाळी सहा वाजताच केंद्रावर जाऊन मतदान यंत्राची तपासणी करावी असे पवार यांनी सांगीतल. शिवस्मारक, इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडरकर स्मारकाच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. समृद्धी महामार्गाचा गाजावाजा करण्यात आला आहे. त्यासाठी जमीनी संपादीत करण्यात आलेल्या नाहीत. जिथे जमिनी संपादीत केल्या आहेत. तेथे योग्य मोबदला देण्यात आलेला नाही. धनगर आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीतही फसवण्याचे काम करण्यात आलेले आहे. धनगरांनी बारामतीमध्ये उपोषण केले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनगर बांधवांना सत्तेवर आल्यानंतर एका आठवड्यात आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन पाच वर्षातही पाळण्यात आलेले नाही. रोजगार देण्याची भाषा मोदींनी केली होती. मात्र, नोटाबंदीमुळे सुमारे 15 लाख लोकांचे रोजगार गेले आहेत. गेल्या साडे चार वर्षात सुमारे 11 हजार 998 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकर्‍यांच्या कजमाफीची घोषणा करण्यात आली असली तरी ती 50 टक्के शेतकर्‍यांपर्यंतही पोहचलेली नाही. सन 2007 मध्ये 350 कोटीमध्ये घेण्यात येणारे राफेल विमान हे सरकार आता 1660 कोटी रुपयांत फ्रान्सकडून घेत आहे. त्याचेही काम कागदी विमानही ज्यांनी बनवले नाही अशा रिलायन्सला देण्यात आले आहे. त्यामुळे बोफोर्सची जशी चौकशी झाली. तशी चौकशी राफेलचीही व्हायला हवी अशी मागणी शरद पवार यांनी यावेळी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading