भूकंपग्रस्तांच्या सहाय्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही – मुख्यमंत्री

भूकंपग्रस्तांच्या सहाय्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पालघर येथील नुतनीकरण केलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर झालेल्या भूकंप आढावा बैठकीत त्यांनी ही ग्वाही दिली. भूकंपामुळे ज्या भागात हानी झाली आहे त्या भागातील रहिवाशांना निवासाची तात्पुरती सोय म्हणून त्यांच्या घराजवळ लहान तंबूची व्यवस्था करावी याचबरोबर घरे बांधण्याकरिता रेट्रो फिटींगसाठीचा तसंच इतर तातडीच्या दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाला दिले. ज्या भागात भूकंपाचे धक्के जाणवतात तिथे यापुढे सर्व घरं भूकंपरोधक बांधणे आवश्यक ठरावे, जवळच असलेल्या उर्जा धरणाचा आढावा घेऊन आवश्यक दुरूस्त्या तातडीने कराव्यात असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. धुंदलवाडीजवळ भूकंपाचं केंद्र असून जवळपासची १७ गावं प्रभावित झाल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिली. भूकंपग्रस्त भागातील १३०० घरं मदतीसाठी पात्र असून आत्तापर्यंत ५०० टारपोलींचे वाटप करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पालघर येथील नुतनीकरण केलेल्या विश्रामगृहात मुख्यमंत्र्यांसाठी एक सूट, ४ व्हीव्हीआयपी सूट, ८ व्हीआयपी सूट आणि इतर ८ खोल्यांसह बैठकीसाठी आणि भोजनासाठी मोठे कक्ष अशी सुसज्ज व्यवस्था आहे. १५७९ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली ही इमारत अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: