भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय खर्डी शाळा क्रमांक १ चं नामकरण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव यांच्या हस्ते झालं. या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेतील विविध वर्गात शिकणा-या ४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. शहापूर सारख्या भागात आंतरराष्ट्रीय शाळा उभारली जात आहे. आंतरराष्ट्रीय शाळेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन मंजुषा जाधव यांनी यावेळी दिलं. शाळेच्या दुरूस्तीसाठी ५ लाख रूपये मंजूर करण्यात आले असून या शाळेची लवकरच दुरूस्ती केली जाईल असं उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सांगितलं. या शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शैक्षणिक क्रांती घडेल अशी आशा जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी विवेक भीमनवार यांनी व्यक्त केली. या शाळेत सध्या ७ वर्ग खोल्या असून ६ शिक्षक कार्यरत आहेत. शाळेमध्ये बालशिशु वर्ग आणि पहिली ते तिसरीचे अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेचे वर्ग आहेत. शिशु वर्गात ९० मुलं शिकत आहेत. तर पहिलीमध्ये ४५, दुसरीमध्ये ४३ तर तिसरीत ३१ मुलांचा पट आहे. या शाळेसाठी ५ एकर जागा ग्रामपंचायतीनं दिली असून या जागेवर पहिली ते बारावीपर्यंत इमारत बांधण्याचं प्रस्तावित आहे.
