कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्च अखेर पर्यंत बीएसयुपी प्रकल्पांतर्गत सर्व इमारतींचं काम पूर्ण करून त्या सर्व सदनिका लाभार्थ्यांना वितरीत करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. बीएसयुपी प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी सर्व संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बीएसयुपी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या इमारतींच्या सद्यस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी भाडेतत्वावरील घरामध्ये यापूर्वी ज्या प्रकल्प बाधितांना घरं देण्यात आली आहेत त्यांची यादी अंतिम करून त्यांना तातडीने सदनिका वितरीत करण्याचे आदेश दिले. मात्र या सर्व ठिकाणी लिफ्ट, वीज आणि पाणी जोडणी तातडीनं करण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या. ज्या इमारतींना वापर परवाना मिळाला नसेल त्यांना असा परवाना देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याबाबतचे आदेश देतानाच ज्या ठिकाणी रस्ता किंवा किरकोळ कामं अपूर्ण अवस्थेत आहेत ती कामं युध्द पातळीवर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. खारटन, सिध्दार्थनगर, पडले, ब्रह्मांड, तुळशीधाम अशा ठिकाणी बीएसयुपी अंतर्गत इमारतीच्या बांधकामाची कामं पूर्णत्वास गेलेली आहेत. या प्रकल्पांतर्गत ६ हजार ३५९ सदनिका प्राप्त होणार असून ३ हजार ८०८ सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे. यापैकी ३ हजार ५४४ सदनिका यापूर्वीच लाभार्थ्यांना देण्यात आल्या आहेत तर उर्वरित २ हजार ५५१ सदनिकांचं काम प्रगतीपथावर आहे.
