ठाण्यातील बीएसयुपीची घरं भाडेतत्वावरील घरात राहणा-या विस्थापितांना द्यावीत अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं केली आहे. ठाण्यामध्ये बीएसयुपीची ६ हजार ३५९ घरं तयार असून त्यातील ३ हजार ५४४ घरं विविध पात्र नागरिकांना देण्यात आली आहेत. उर्वरित २ हजार ८१५ घरं भाडेतत्वावरती राहणा-या विस्थापितांना द्यावीत अशी ठाणे मतदाता जनजागरण अभियानाची मागणी आहे. शहरातील अनेक विकासकामात विस्थापित झालेल्या कुटुंबांची महापालिकेनं भाडेतत्वावरील घरात तात्पुरती सोय केली आहे. या विस्थापितांनी महानगराच्या विकासात आपलं राहतं घर देऊन योगदान दिलं आहे. त्यामुळं अशा भाडेतत्वावर राहणा-या विस्थापितांनाच बीएसयुपीतील २ हजार ८१५ घरं द्यावीत अशी मागणी अभियानानं आयुक्तांकडे केली आहे. येत्या १८ तारखेला होणा-या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडावा अशीही अभियानाची मागणी आहे.
