बिबळ्या दिसल्यास काय करावे अथवा करू नये याविषयी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे मार्गदर्शन

ठाण्यातील सत्कार रेसिडेन्सीमध्ये लपलेल्या बिबळ्याला पकडल्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे समतानगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना बिबळ्या दिसल्यास काय करावे आणि करू नये याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. ठाण्यातील सत्कार रेसिडेन्सीमध्ये पाण्याच्या टाकीखाली लपलेल्या बिबळ्याला २० फेब्रुवारी रोजी पकडण्यात आलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग येऊरमध्ये येतो. पूर्वी येऊरच्या पुढचा म्हणजे वर्तकनगर, शिवाईनगर हा भाग जंगल होता. मात्र हळूहळू वस्ती वाढत येऊरच्या डोंगरापर्यंत गेली. त्यामुळं वन्यजीवांच्या हद्दीत मानवी वस्तीचा शिरकाव झाल्यामुळं अनेकदा वन्यजीव मानवी वस्तीमध्ये शिरल्याची उदाहरणं आहेत. ७ वर्षापूर्वी खोपटमध्येही भरवस्तीत बिबळ्यानं दर्शन दिलं होतं. त्यामुळं बिबळ्या दिसल्यास काय करावे आणि काय करू नये याविषयी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे समतानगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना मार्गदर्शन करण्यात आलं. या परिसरामध्ये मोठे दिवे लावावेत, रस्त्यावर कचरा येऊ देऊ नये, त्याचप्रमाणे बिबळ्या दिसल्यास आणि जवळ लहान मूल असल्यास त्याला उंच उचलून घ्यावं आणि बिबळ्याला पाहून पळू नये अशा काही सूचना करताना बिबळ्याचा आहार, विहार, सवयी, त्याचा प्रदेश याविषयीही मार्गदर्शन करण्यात आलं.

Leave a Comment

%d bloggers like this: