ठाणे महापालिकेतील निवृत्त कर्मचारी प्रदीप कारखानिस यांनी अवयवदान केल्यामुळे ६ जणांचे प्राण वाचले आहेत. प्रदीप कारखानिस हे अनेक वर्षांपासून पार्कीन्सन्स या विकाराने आजारी होते. एका नातेवाईकाकडे गेले असताना जिना चढताना ते पडले आणि त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. त्यांना त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड म्हणून घोषित केलं तसंच अवयवदानाची विनंती केली. कारखानिस यांच्या ८५ वर्षाच्या मातोश्रींनी अवयवदानास संमती दिली. प्रदीप कारखानिस यांचा मुलगा प्रणव यानं सांगितलं की, वडिलांच्या अवयवदानामुळे जर अन्य कुणाचे प्राण वाचत असतील तर ते आपलं भाग्यच आहे. प्रदीप कारखानिस हे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रूग्णालयात काम करत होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
